Summary of the Book
आपल्यावर येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या मनापासून पार पाडणारी आजची स्त्री ! मग ती डॉक्टर असेल, इंजिनिअर असेल, आयटीतली असेल, बँकेत असेल, शिक्षिका असेल किंवा आणखी कोणत्या क्षेत्रातील. नोकरी करणारी असेली वा स्वतंत्र व्यवसाय करणारी. प्रत्येक दिवस येतो एक नवीन आव्हान घेऊन.
त्या आव्हानांचा सामना करत असतानाच एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून, एक सून म्हणून, एक सासू म्हणून, एक लेक म्हणून अशा सगळ्या विविध आघाड्यांवर यशस्वीपणे लढतानाही तिच्यातली ममता, घरावरचे तिचे प्रेम, मोठ्यांबद्दलचा तिचा आदर, तिच्यातली कणव आणि तिचे हळवेपण ती जपत राहते. या प्रत्येक स्त्रीच्या मनातली काव्ये म्हणजेच गीतांजलीची ‘गीत स्पंदने’ स्त्रीचे मन मुळातच हळवे.
‘डॉक्टर स्त्री’ मन तर अधिकच संवेदनशील. त्या हळवेपणातून टिपलेल्या समाजातल्या वेदना आणि रुग्णांच्या वेदनांतून आलेल्या सहवेदनेतून उमटलेल्या या कविता. पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS व MS करून गेली २० वर्षे पुण्यात नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत असताना आलेल्या विविध अनुभवांतून उमललेली एक डॉक्टर स्त्री हृदयाची काव्य स्पंदने म्हणजेच डॉ. गीतांजली शर्मा (कसमळकर) यांची ‘गीत स्पंदने!’