डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो, हे साधारण गृहीत धरले जाते. त्यानुसार, आदित्य नेर्लेकर हा वडिलांचा वैद्यकीय पेशा पुढे चालविण्यासाठी डॉक्टरीच्या क्षेत्रात येतो. छोट्या गावातील सुखवस्तू कुटुंबातील आदी पुण्यात शिक्षणासाठी येतो. हॉस्टेलवर विनय नेहेते व अजय तांबे या रूमपार्टनरबरोबर आदीचे कॉलेज लाईफ सुरु होते.
तेथील भकास वातावरणात आदी रुळू लागतो. अनेक मित्रही मिळतात. अभ्यासाबरोबर इतर गोष्टीही सुरु होतात. मित्रांच्या नादाने सिगारेटसारखे व्यसन सुरु होते. त्याची बालपणीची मैत्रीण मधुरा हिच्या गाठीभेटी होऊ लागतात. पण मौजमजेत पहिल्या परीक्षेत नापास झाल्याचा आदिला व त्याच्या मित्रांना झटका बसतो. पुन्हा जोमाने अभ्यास सुरु होतो. मित्रांच्या सुख, दुःखात साथ देताना आदिचेही आयुष्य सुरळीत चालू असते. मधुरासाठी घरून होकार येतो आणि अदीचा आनंद गगनात मावेनासा होतो.
मात्र, त्याच्या सुखाला गालबोट लागते. मधुरा त्याला कायमची सोडून जाते. एकाकी झालेला आदित्य मधुराच्या आठवणी काढीत हॉस्टेलवर रिपिटर्सबरोबर पुढे जाण्याचा निश्चय करतो. डॉ. अमित बिडवे यांची 'दिल, दोस्ती....डॉक्टरी' या कादंबरीतून आदित्य नेर्लेकरांची हि गोष्ट वाचकांना गुंतवून ठेवते.