जवळच्या टेकडी परिसरात फिरायला जायचो, तेव्हा तिथल्या झाडांशी, वेलींशी, पायवाटेशी मी मनातल्या मनात बोलू लागलो आणि त्याची गंमत वाटू लागली. या झाडांच्या, वेलींच्या, दगडांच्या, कोळीकीटकांच्या दृष्टीने जग पाहू लागलो.
मी त्यांना शब्द दिले, संवाद दिले, ते माझ्याशी बोलू लागले. खरं तर मीच माझ्याशी बोलू लागलो होतो. लहान मुलांमध्ये जशी `फॅंटसी’ असते, तिने उतारवयात माझ्यात प्रवेश केला आणि मीही परत लहान झालो. या गोष्टींनी मला खूप खूप दिलंय. बालपण तर दिलंच. माणसांच्या सुखदुःखांकडे आजवर पाहत होतो आता त्या पलीकडच्या सृष्टीला काय म्हणायचंय तो आवाज ऐकू लागलो आणि भराभरा लिहीत गेलो.
`सृष्टीत… गोष्टीत’ या पहिल्या गोष्टींना छान प्रतिसाद मिळाला. नंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या या पन्नास गोष्टी. त्याही तुमच्यापुढे ठेवीत आहे.