या आॅडिओ माध्यमातून आपणास सुपरिचित असलेल्या "श्री गणपति अथर्वशीर्षाचा अर्थ मराठीत समजून घेऊन अर्थरूप होऊन कसे रहाता येईल हे सांगण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. जे पूर्वी शाळा/महाविद्यालयात संस्कृत शिकलेले आहेत, तसेच जे नव्यानेच संस्कृत शिकावयास सुरूवात करणार आहेत त्या सर्वांना या विषयात रूची निर्माण व्हावी; शब्द, त्याची व्युत्पत्ती, व्याकरण व अर्थ, पालकांच्या/शिक्षकांच्या मदतीने समजून घेता यावे असा विचार ठेवून याची मांडणी केली आहे. या पुस्तकाचा उपयोग प्रामुख्याने माध्यमिक शाळांत पाचवीच्या वर्गापासून व्हावा, जेणेकरून विद्यार्थीदशेपासूनच मुला/मुलींमध्ये स्वत:कडे पहाण्याचा, स्वत:ला ओळखण्याचा, स्वत:मध्ये योग्य आत्मविश्वास निर्माण करण्याचा आणि पर्यायाने इतरही माझ्यासारखेच आहेत असा "एकात्मकतेचा" भाव { मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असू दे} निर्माण व्हावा हा आहे. श्री गणपति अथर्व शीर्ष हे उपनिषदाचा भाग आहे. उपनिषद म्हणजे गुरुने शिष्याला उपदेश केलेले अंतिम सत्याचे ज्ञान होय. असे जर आहे तर "अथर्वशीर्ष" हे गणपतीसाठी नसून मानवासाठीच असले पाहिजे. हाच विचार या पुस्तकाच्या भाग 2 मध्ये भाष्यकार म्हणून श्री. प्रभाकर करंबेळकर यांनी विशद केला आहे.